जून महिना तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या मासिक राशी भविष्य

जून महिना काही राशींसाठी जबरदस्त ठरणार आहे. तर काही राशींना संमिश्र प्रतिसाद मिळणार आहे. मेष ते मीन राशींवर ग्रहांचा परिणाम होतो. त्यामुळे कुठे आनंद, तर कुठे दु:ख तर होणारच यात काही दुमत नाही. जून महिन्यात काही ग्रहांचे गोचर होणार आहेत. त्यामुळे शुभ अशुभ योग जुळून येतील. त्याचा परिणामही राशीचक्रावर होईल. त्यामुळे एकंदरीत जून महिना आपल्या राशीसाठी कसा असेल ते जाणून घेऊयात

मेष : या राशीच्या जातकांना महिन्यात चढउतार जाणवेल. नवीन गाडी किंवा प्रॉपर्टी खरेदीसाठी उत्तम काळ आहे. काही गोष्टींमधून भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक फलदायी ठरेल असंच म्हणावं लागेल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. काही कार्यक्रम घरात पार पडतील. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास चांगली बचत होईल. प्रेम प्रकरणासाठी महिन्याचा उत्तरार्ध चांगला जाईल.

वृषभ : हा महिना या राशीच्या जातकांना खर्चिक जाईल. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आतापासून तयारी करा. अन्यथा डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहील. या काळात भावंड आणि मित्रांची चांगली साथ मिळेल. घरातील वातावरण चांगलं राहील. पण काही प्रकरणात वादावादी होऊ शकते. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा योग जुळून येईल. नोकरीच्या ठिकाणी तुमची स्थिती चांगली राहील.

मिथुन : या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास महिन्याचा उत्तरार्ध चांगला जाईल. उत्पन्न चांगलं असल्याने हाती घेतलेली कामं झटपट पूर्ण होतील. घरात काही धार्मिक कार्य पार पडतील. कुटुंबासोबत पिकनिक जाण्याचा योग जुळून येईल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

कर्क : या राशीच्या जातकांना महिन्याच्या सुरुवातीला संकटांचा सामना करावा लागू शकतो. नुसता पैसा हाती असून चालत नाही. तर कामंही झटपट होणं गरजेचं आहे. काही कामांमुळे विनाकारण त्रास सहन करावा लागू शकतो. आरोग्य एकदम मस्त राहील. कौटुंबिक वाद शमल्याने बरं वाटेल.

सिंह : या राशीच्या जातकांना महिन्याची सुरुवात चांगली जाईल. नोकरीच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा वाढेल. बॉस खूश असल्याने डोक्यावरचा भार हलका होईल. आत्मविश्वास वाढल्याने कामंही झटपट होतील. कुटुंबाला वेळ द्या. प्रेम प्रकरण चांगलं राहील. आरोग्यविषयक तक्रारी या महिन्यात डोकं वर काढतील.

कन्या : या राशीच्या जातकांना महिन्याच्या सुरुवातीपासून तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मानसिक तणाव सहन करण्याची ताकद ठेवा. कामाच्या ठिकाणी काही अप्रिय घटना घडतील. पण खचून जाऊ नका. मेहनत करून त्यावर मात मिळवण्यात प्रयत्न करा. निश्चितच यश मिळेल. कौटुंबिक वातावरण गढूळ असल्याने वाद होईल असं बोलू नका.

तूळ : या महिन्याची सुरुवात या राशीच्या जातकांसाठी लाभदायी ठरेल. कामं वेळेत होत असल्याने त्यातून पुरसत मिळेल.नवीन नोकरीच्या ऑफर या काळात मिळू शकतात. आपल्या रणनितीनुसार कामं होत असल्याने आनंदी राहाल. भावंडांसोबत नवीन बिझनेस सुरु करू शकता. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. रात्री निवांत झोप घ्या. विनाकारण जागरण करू नका.

वृश्चिक : तुम्ही या महिन्यात काही गुंतवणूक करायच्या विचारात असाल तर काळजी घ्या. योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन पावलं टाका. नोकरीसाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. पण उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्याने बजेट कोलमडून जाईल. हितशत्रूंकडून नाहक त्रास होऊ शकतो. त्यामुळे सावधपणे पावलं उचला.

धनु : या राशीच्या जातकांना चांगलं उत्पन्न मिळेल. उत्पन्न वाढल्याने बचत चांगली होईल. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीकोनात आखलेल्या योजना मार्गी लागतील. विशेष म्हणजे आता केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात चांगला फायदा होईल. पोटासंबंधी आजार त्रास देऊ शकतात. त्यामुळे हलका आहार घेण्यावर जोर द्या. शक्य झाल्यास रोज व्यायाम नक्की करा.

मकर : या राशीच्या जातकांना महिन्याची सुरुवात चांगली होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. त्यामुळे काही लोकांचा जळफलाट होईल. त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. एकंदरीत उत्पन्नाच्या दृष्टीकोनोतून संपूर्ण महिना चांगला जाईल. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्हाला एखादा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कुंभ : या राशीच्या जातकांना हा महिना मिळताजुळता राहील. काही नवीन करण्याचा प्रयत्न करा. पण यश थोडं उशिराने मिळेल. त्यामुळे धीर सोडू नका. नोकरीच्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकते. भावंडांसोबत जमिनीवरून वाद होऊ शकतो. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणांना सामोरं जावं लागू शकतं. प्रेम प्रकरणात तणाव राहील पण महिन्याच्या शेवटी सर्व काही निवळेल. वैवाहिक जीवनातही काही अडचणींचा सामना करावा लागेल.

मीन : या राशीसाठी हा महिना तसा पाहिला तर त्रासदायक जाईल. मानसिक आणि आर्थिक फटका या महिन्यात बसू शकतो. एकिकडे हाती आलेले पैसे झटपट खर्च होताना दिसतील. आरोग्यविषयक तक्रारींमुळे पुरते हैराण होऊन जाल. पण डोकं शांत ठेवून एक एक गुंता सोडवा. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची उत्तम साथ मिळेल. परदेशात जाण्याचा योग जुळून येईल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *