NMJOKE

मारायला आलेले मारेकरी बनले होते रक्षक

महात्मा जोतीराव फुले यांना ‘महात्मा’ का म्हटलं जायचं? ज्याप्रमाणे गौतम बुद्धांनी डाकू अंगुलीमालाचे हृदयपरिवर्तन करून त्याला बौद्ध भिक्खू बनवले त्याच प्रमाणे महात्मा फुले यांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन जणांनी महात्मा फुलेंना सामाजिक कार्यात साथ दिली. त्या दोघांपैकी एक जण महात्मा फुलेंचा अंगरक्षक बनला तर दुसरे गृहस्थ सत्यशोधक समाजाचे पंडित बनले आणि त्यांनी ग्रंथरचना देखील केली.

महात्मा फुलेंनी महिला आणि वंचित, शोषित शेतकरी वर्गाच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वेचले. हे करत असताना त्यांना आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पुराणमतवादी लोकांचे बोलणे, टोमणे आणि प्रसंगी शिव्या खाव्या लागल्या. काही लोकांनी त्यांच्यावर शेण देखील फेकले पण हे दाम्पत्य आपल्या जीवितकार्यापासून ढळले नाही. जेव्हा आपल्या विरोधाचा काहीच परिणाम या दोघांवर होत नाही असे पाहून काही लोकांनी फुले यांना जीवे मारण्यासाठी दोन मारेकरी पाठवले होते.

आज महात्मा फुले यांची जयंती. त्यानिमित्तानं त्यांच्या जीवनकार्यावर केलेली बातमी पुन्हा शेयर करत आहोत. जोतिबा फुले ‘महात्मा’ कसे बनले? खंडोबाची ‘तळी’ उचलणारा महात्मा फुलेंचा ‘सत्यशोधक समाज’ नेमका काय आहे? दिवसभराचे काम आटोपून मध्यरात्री फुले आराम करत होते. त्याचवेळी त्यांना घरात असलेल्या खुडबुडीने जाग आली. घरात समईचा मंद प्रकाश होता त्यात त्यांना दोन अंधुक आकृत्या दिसल्या आणि त्यांनी मोठ्याने विचारले कोण आहे रे तिकडे. असे विचारताच त्या मारेकऱ्यांपैकी एकाने म्हटले ‘तुमचा निकाल करावयास आम्ही आलो आहोत’ तर दुसरा मारेकरी ओरडला ‘तुम्हांस यमसदनास पाठवण्यासाठी आम्हांस धाडले आहे.’

हे ऐकताच महात्मा फुलेंनी त्यांना विचारले, “मी तुमचा काय अपराध केला आहे, ज्यामुळे तुम्ही मला मारत आहात?” त्यावर ते दोघे उत्तरले की, तुम्ही आमचे काही वाईट केले नाही पण तुमचा निकाल लावण्यासाठी आम्हाला पाठवले आहे. महात्मा फुलेंनी त्यांना म्हटले, की मला मारून तुमचा काय फायदा? यावर ते म्हणाले, “तुम्हाला मारल्यास आम्हाला प्रत्येकी हजार रुपये मिळणार आहेत.”

हे ऐकताच महात्मा फुले म्हणाले, “अरे, वा! माझ्या मृत्यूने तुमचा फायदा होणार आहे, तर घ्या माझे डोके. ज्या गरीब जनतेची सेवा करण्यात मी सद्भाग्य आणि धन्यता मानली, त्यांनीच माझ्या गळ्यावरुन सुरी फिरवावी हे माझे सद्भाग्य होय. चला आटपा. माझे आयुष्य दलितांकरिताच आहे. कसे झाले तरी माझ्या मरणानेसुद्धा गरिबांचेच हित होत आहे.” त्यांचे हे उद्गार ऐकून मारेकरी भानावर आले आणि त्यांनी महात्मा फुलेंची माफी मागितली. उलट ज्या लोकांनी मारण्यासाठी पाठवले आहे त्यांना मारण्याची आम्हाला परवानगी द्या, असं ते म्हणाले.

यावर महात्मा फुलेंनी त्यांना समजावून सांगितले आणि सूडबुद्धी नसावी अशीच समज दिली. या प्रसंगानंतर हे दोघे महात्मा फुलेंचे सहकारी बनले. यातील एकाचे नाव होते रोडे तर दुसरे होते पं. धोंडिराम नामदेव. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या चरित्रात ही गोष्ट आपल्याला वाचायला मिळते. ही गोष्ट वाचल्यावर सहजच मनात विचार येतो की केवळ चार पाच वाक्य बोलून एखाद्या व्यक्तीच्या जीवावर प्रसंग आला असेल तर तो दूर कसा जाऊ शकतो.

पण फुलेंचे पूर्ण चरित्र वाचल्यावर असे लक्षात येते, की ही चार-पाच वाक्य त्यांच्या जीवनाचे सार आहे. त्यांनी ती वाक्ये केवळ बोलली नाही तर त्यातला शब्द न् शब्द ते जगले आहेत. त्यांनी केवळ शोषितांसाठी आयुष्यच वेचले नाही तर त्यांचे विचार आजही तंतोतत लागू होतात आणि समाजाला दिशा देणारे आहेत. महात्मा फुलेंचे निधन होऊन 132 वर्षं झाली आहेत पण त्यांच्या विचारातला ताजेपणा, टवटवीतपणा अद्यापही कायम आहे.

महात्मा फुले हे मानवतावादी विचारवंत तर होतेच पण त्याचबरोबर ते एक द्रष्टे कृषी तज्ज्ञ होते. त्यांच्या विचारांची कास धरून आपण पावले उचलली तर देशातल्या कृषी समस्यांची कोंडी सुटू शकते असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करतात. महात्मा फुले आणि त्यांचे शेतीविषयक विचार पाहण्याआधी आपण त्यांचे कार्य आणि त्याची पार्श्वभूमी समजून घेऊ.

Exit mobile version