डाॅक्टरसाहेब, किडनी घ्या, पण दीड लाख द्या! कर्जबाजारी शेतकऱ्याची विनंती

‘डाॅक्टरसाहेब, माझ्या दाेन मुलींच्या लग्नासाठी काही वर्षांपूर्वी तीन ते चार जणांकडून कर्ज काढले हाेते. त्याबदल्यात एकाच्या शेतावर काम करताेय. त्यातील काही पैसे परत केले. आता काम हाेत नाही अन् मला त्यांचे व्याजाचे मिळून दीड लाख द्यायचेत. कृपया माझी किडनी घ्या; पण मला दीड लाख रुपये द्या,’’ अशी विनवणी एका शेतमजुराने डाॅक्टरांकडे केली

सातारा येथून ससून रुग्णालयात आलेल्या या शेतमजुराने केलेल्या विनंतीनंतर डाॅक्टरही गाेंधळून गेले. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातले गव्हाणवाडी येथील रहिवासी भिका अडागळे (वय ५६) हे रविवारी भल्या सकाळीच ससूनमधील अपघात विभागात (कॅज्यूअल्टी वाॅर्ड) आले हाेते. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या डाॅक्टरांना वाटले की, काही तपासणी करायची म्हणून ते आले असावे. परंतु, तपासणीऐवजी त्यांनी डाॅक्टरांना किडनीची ऑफर देत दीड लाख रुपये द्या, अशी भलतीच मागणी केली.

त्यामुळे डाॅक्टरही बुचकळ्यात पडले.थाेडा पाॅज घेत डाॅक्टरांनी त्या शेतमजुराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कायद्याने असे करता येत नाही, असे सांगितले. परंतु, अडागळे ऐकण्याच्या तयारीत नव्हते. शेवटी ससूनमधील वैद्यकीय समाजसेवा अधीक्षकांकडून त्यांचे समुपदेशन करण्याचे ठरले.अडागळे यांच्याबाबत अधिक माहिती घेतली असता त्यांना दाेन मुली असून, त्यांचे लग्नही झाले आहे. त्यांना म्हातारपणाची काठी धरणारा मुलगा नाही की शेतजमीनही नाही. दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करून पाेट भरतात.

पंधरा ते वीस वर्षांपूर्वी त्यांनी दाेन्ही मुलींचे लग्न करण्यासाठी तीन ते चार सावकारांकडून लाख ते दीड लाख रुपये व्याजाने घेतले हाेते. पैसे घेतलेल्यांपैकीच एका सावकाराच्या शेतावरच ते गेली २५ वर्षे महिन्याकाठी अवघ्या ७०० रुपयांवर काम करत आहेत, अशी माहिती अडागळे यांनी दिली.दरम्यान, सर्व पैसे परत करू न शकल्याने संबंधित सावकार मारहाण करत असल्याचे अडागळे यांनी सांगितले. सावकाराच्या दबदब्याला घाबरून अद्याप काेणाकडेही तक्रार केलेली नाही.

यावरून हा वेठबिगारीचा प्रकार असल्याची देखील शक्यता आहे.मी जगलाे काय अन् मेलाे काय मी काम करून सावकारांचे ७५ हजार परत केले; पण तरीही अजून दीड लाख रुपये देणे बाकी आहे. आता काम हाेत नाही अन् सावकारांचा त्रासही सहन हाेत नाही. त्यामुळे किडनी देण्यास मी तयार आहे. यानंतर मी जगलाे काय अन् मेलाे काय काही फरक पडत नाही. – भीका अडागळे, गव्हाणवाडी, पाटण, सातारा.

तर त्याला भरपाईदेखील मिळवून देऊ शकतात वेठबिगार कामगार म्हणजे साखळदंडाने, जाेरजबरदस्तीने बांधून काम करून घेतले पाहिजे असे नाही. अशी परिस्थिती निर्माण करायची की कामगाराला किमान वेतन न देता त्याची इच्छा असली तरी ताे कामावरून साेडून जाऊ शकत नाही, या प्रकाराला वेठबिगारी म्हणतात. हे स्वत: सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. अशा प्रकरणात त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वेठबिगारी कायद्याखाली मजुराची सुटका करू शकतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *