अवघ्या दोन एकर शेतीला दुध आणि शेणाच्या जोडधंद्याची जोड देत हा शेतकरी झाला मालामाल!

आजपासुन सुरु झालेल्या दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे दिवाळी “वसुबारस”! हिंदू संस्कृतीत गाईला माता मानलं जात. गाई-गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस! आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो. आजवर अनेक उद्योजकांच्या यशोगाथा तुम्ही ऐकल्या पाहिल्या असतील, मात्र केवळ एक गाय विकत घेऊन शून्यातून विश्व निर्माण करत त्यावर दुग्धव्यवसाय करणाऱ्या एका यशस्वी उद्योजकाने चक्क एक कोटींचा बंगला बांधून त्यावर दुधाचा कॅन आणि गायीचा पुतळा उभारल्याने हे उद्योजक सध्या सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळवताना दिसत आहेत.

सांगोला तालुक्यातील सावे इमडेवाडी या गावात प्रकाश इमडे याच कारणासाठी प्रसिद्ध आहेत. १९९२ सालापासून ते दुग्धव्यवसाय करत आहेत.त्यांच्याकडे आज दोन एकर परिसरात तब्बल १७५ जरशी गायी आहेत गोठ्याला लागूनच त्यांचा ‘गोधन निवास’ नावाचा एक कोटींचा बंगला देखील दिमाखात उभा आहे. अतिशय खडतर प्रवास करत या इमडे दाम्पत्याने दुग्ध व्यवसायात उडी घेतली.

रडत बसण्यापेक्षा लढत राहिलेलं कधीही चांगलं असं ते कायम म्हणतात याच प्रेरणेतून सुरुवातीला पारंपरिक शेती करत ते आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होते . त्यावेळी सांगोला बाजारातून त्यांनी एक गाय विकत घेतली होती. त्या एका गायीने सलग सात वेळा कालवडी दिल्या. यातूनच त्यांना उत्पन्न मिळू लागले. सांगोला तालुका हा तसा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पाणी कमी पडू लागले तसतसे त्यांना जनावरांसाठी चारा, वैरणचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी चारा विकत घेण्याची ठरवले.

अविरतपणे मेहनत करत त्यांच्याकडे आज दोन एकर परिसरात १७५ गायी आहेत. ह्या सर्व गायींना त्यांनी बंगल्याच्या बाजूलाच असलेल्या मुक्त संचार गोठ्यात ठेवले आहे. त्यांच्या देखरेखीसाठी चार माणसं त्यांनी कामाला ठेवली आहेत. एवढ्या गायींचे दूध काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी केला आहे. घरातील महिलांचा देखील या कामात मोठा हातभार लागतो.

दिवभराची साफ सफसाई, जनावरांच्या आरोग्याची काळजी त्यांना वेळोवेळी घ्यावी लागते. या १७५ गायींपासून रोज एक हजार लिटर दुध निघते. येणारा सर्व खर्च वगळता महिन्याला दीड लाखांचा नफा त्यांना मिळतो.गायीच्या शेणापासून प्रकाश इमडे यांना वर्षाकाठी ७ ते ८ लाखांचे उत्पन्न मिळते. हे शेणखत विकूनच त्यांनी स्वतःसाठी एक कोटींचा दिमाखदार बंगला उभारला आहे. त्यावर गायीची आणि दुधाच्या कॅनची प्रतिकृती उभारली आहे. मिळणाऱया उत्पन्नातून ते दरवर्षी शेतजमीन खरेदी करतात.

प्रकाश इमडे आपल्या जनावरांना विकतचाच चारा पुरवतात. शेती करण्यापेक्षा, मजुरांचा खर्च आणि वाहनाचा खर्च करण्यापेक्षा त्यांना विकत घेतलेला चारा जास्त परवडतो. आजच्या तरुण वर्गाला त्यांनी मार्गदर्शन करत अशा व्यवसायात जिद्दीने उतरावे असा सल्ला दिला आहे. सुरुवातीला चार गायींपासून तुम्हाला निश्चित असे उत्पन्न मिळू लागले की तुमची यशाकडे वाटचाल सुरू झाली असे समजा. फक्त जनावरांना वेळच्यावेळी चारा, पाणी दवाखाना करत राहिला की हा व्यवसाय देखील तुम्हाला उत्पन्न मिळवून देतोचं! सर्वांना प्रेरक ठरणार्या प्रकाश ईमडेंना भविष्यासाठी शुभेच्छा! 😊

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *