“मराठी कौटुंबिक मालिकेचा पाया ठरलेली आभाळमाया अजुनही आपलीशी का वाटते?”

सध्याच्या अनेक मालिकांवर प्रेक्षक नाराज आहेत. कारण, TRP च्या नादात या मालिका भरकटत चालल्या आहेत. अशावेळी प्रेक्षकांकडून जुन्या मालिका पुनःप्रसारित कराव्यात ही मागणी वारंवार केली जातेय. या यादीमध्ये घेतलं जाणारं एक नाव म्हणजे आभाळमाया! झी मराठी (पूर्वीचं अल्फा टीव्ही) या चॅनेलवर १९९९ साली प्रदर्शित झालेली ही मालिका खाजगी चँनेलवरची पहिली तर, मराठी मालिकाविश्वातली दामिनी नंतरची दुसरी ‘डेली सोप’ होती.

कोणताही भपकेबाजपणा नाही की मेलोड्रामा नाही. एक साधं, सरळ कथानक, जोडीला अनुभवी कलाकार आणि विनय आपटे यांचं दिग्दर्शन यामुळे ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. सुधा (सुकन्या कुलकर्णी), शरद (मनोज जोशी) आणि जय (संजय मोने) या तीन मालिकेमधील मुख्य व्यक्तिरेखा. परंतु यांच्याव्यतिरिक्त मालिकेमध्ये अजूनही काही महत्वाच्या व्यक्तिरेखा आहेत आणि त्यांची उपकथानकं दाखवण्यात आली आहेत. या सर्व व्यक्तिरेखा आणि त्यांची कथानकं एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. तरीही ती उथळ किंवा ओढून ताणून मालिकेमध्ये घेतल्यासारखी वाटत नाहीत.

शरद, सुधा आणि जय तिघेजण कॉलेजपासूनचे मित्र. जयचं सुधावर मनापासून प्रेम असतं. परंतु जेव्हा तिचं शरदवर प्रेम आहे हे कळतं तेव्हा तो आनंदाने तिचा मित्र बनून राहतो आणि नेहमी तिला साथ देतो. सुधाशी प्रतारणा करणारा शरद तिच्यावर खरंतर जीवापाड प्रेम करत असतो. त्याचा तिच्यावर विश्वास असतो म्हणूच तो कधीही तिच्या आणि जयच्या मैत्रीवर आक्षेप घेत नाही. पुढेही स्वतःची चूक स्वीकारून तिच्यापासून दूर जातो.

सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या अनेक घडामोडी या मालिकेत पाहायला मिळाल्या. प्रत्येक वयोगटाचं भावविश्व या मालिकेमधून अलगदपणे उलगडून दाखवण्यात आलं. मग ती लहानगी चिंगी असो किंवा मोठ्या आक्का. यामधील अनेक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना मनापासून आवडल्या होत्या. पण विशेष भावली ती या मालिकेची नायिका ‘सुधा’.

सुधा हुशार आहे, करिअर ओरिएंटेड आहे. एका कॉलेजमध्ये प्राध्यापिकेची नोकरी करते. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तिने प्रमोशनही मिळवलं आहे. पण त्याचवेळी ती आपला संसारही उत्तम रीतीने सांभाळत आहे. नोकमीमध्ये येणाऱ्या समस्यांचा, आव्हानांचा सामना करताना ती वैयक्तिक आयुष्यातल्या दुःखांशीही लढत असते.

त्या काळात स्त्री स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. बहुतांश मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यवर्गीय कुटुंबात नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण वाढत होतं. याच काळात नोकरी / व्यवसाय वा आदी कारणांनी विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आल्यामुळे या स्त्रिया नोकरी आणि संसार अशी तारेवरची कसरत करत होत्या. नोकरी आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळताना आपल्या मुलांना उत्तम शिक्षण आणि संस्कार मिळावेत याकडे कटाक्षाने लक्ष देत होत्या. मालिकेमधली सुधा या स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. यामुळेच त्याकाळच्या स्त्री वर्गामध्ये सुधा आणि ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली.

सुधाची कहाणी थोड्याफार फरकाने प्रत्येकीला आपली कहाणी वाटू लागली. सुधा हळवी आहे पण तितकीच ती स्वाभिमानीदेखील आहे. पतीच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळल्यावर ती त्याला घरातून निघून जायला सांगते, पण त्याचवेळी या संबंधातून झालेल्या त्याच्या मुलीला ती स्वीकारते. तिचा दुःस्वास न करता तिला आईचं प्रेम देते. जे घडलं त्यामध्ये तिचा काहीच दोष नाही, हा सुज्ञ विचार ती करून तिची जबाबदारीही घेते. सुधाला माहीती असतं ही मुलगी तिला नेहमी तिच्या पतीने केलेल्या प्रतारणेची आठवण करून देईल. तरीही ती तिची जबाबदारी घ्यायला कचरत नाही. पण या प्रसंगामध्ये तिच्या मनात निर्माण होणारं द्वंद्व सुकन्या कुलकर्णी या अभिनेत्रीने अगदी प्रभावीपणे दाखवलं आहे.

शरद, सुधा आणि जयचा मित्र मन्ना प्रधान (उदय सबनीस), शरदची प्रेयसी चित्रा (अतिश नाईक) सुधाची बहीण सुषमा (हर्षदा खानविलकर), सुधाच्या घरात मुलींना सांभाळणारी आक्का (शुभांगी जोशी) सुनंदा सोनावणे (शैला सावंत) कॉलेजमधल्या मुलांचा ग्रुप अशी अनेक पात्रे आणि त्यांची उपकथानकं कथेतला महत्वाचा भाग आहे.

१९९९ला सुरु झालेली ही मालिका २००३ सालापर्यंत यशस्वीपणे चालू होती. या मालिकेमधून श्रेयस तळपदे, अंकुश चौधरी, ऋजुता देशमुख, अविष्कार, राहुल मेहंदळे, उमेश कामत, सुबोध भावे, संज्योत हर्डीकर, मनवा नाईक अशा नवीन कलाकारांसोबतच अनेक नामांकित कलाकारांनीही भूमिका केल्या आहेत. या मालिकेमध्ये ‘चिंगी’ची भूमिका साकारणारी स्वरांगी मराठे ही बालकलाकार तेव्हा प्रचंड लोकप्रिय झाली होती. २०१४ साली आलेल्या पोरबाजार या चित्रपटामध्ये तिने नायिकेची भूमिका केले होती.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *