NMJOKE

मोतीसाबण घेऊन “उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली” वाले अलार्म काका…..

दिवाळीची चाहुल लागताचं टीव्ही माध्यमातून ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’ अशी जाहिरात न चुकता पाहायला मिळते. या जाहिरातीत पहाटेच्या वेळी दार वाजवून सगळ्यांना उठवणारे आजोबा म्हणजेच ज्येष्ठ कलाकार ‘विद्याधर करमरकर ‘ यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. विद्याधर करमरकर हे हिंदी चित्रपट अभिनेते म्हणून ओळखले जातात.

आजवर त्यांनी अनेक जाहिराती केलेल्या आहेत. विद्याधर करमरकर यांना सगळेजण आबा म्हणून ओळखायचे. मुंबईत विलेपार्ले येथे ते वास्तव्यास होते. सुरुवातीच्या काळात नोकरी करून त्यांनी आपली अभिनयाची आवड जोपासली होती. वर्षीकोत्सव कार्यक्रमात ते नेहमी हिरीरीने सहभागी व्हायचे. त्यात अनेक नाटकांचे सादरीकरण त्यांनी केले होते तर कधी दिग्दर्शनाची धुरा देखील त्यांनी सांभाळली होती.

कार्तिक कॉलिंग कार्तिक, गेम विथ अनुपम खेर, दोस्ती यारीयां मनमर्जीया , सास बहु और सेन्सेक्स, लंच बॉक्स ,एक थी डायन, एक व्हिलन यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटातून त्यांनी कधी वडील तर कधी आजोबांच्या भूमिका साकारल्या आहेत. जाहिरात क्षेत्रात देखील त्यांचा वावर पाहायला मिळाला. मोती साबण, इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट अशा नामवंत जाहिरातीतूनही त्यांनी काम केलं आहे.

नव्वदीच्या वयातही त्यांचा काम करण्याचा उत्साह भल्याभल्याना लाजवेल असाच होता. एकदा चित्रपटाच्या शुटिंगवेळी ते आजारी पडले होते त्या अवस्थेतही विद्याधर यांनी अगोदर आपले चित्रीकरण पूर्ण करण्यावर अधिक भर दिला होता. काल सोमवारी २० सप्टेंबर २०२१ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी विद्याधर करमरकर यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी खंत व्यक्त केली आहे.
हि दिवाळी काकांना समर्पीत आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली! 👏🏻💐

Exit mobile version