“कॅन्सरवर मात करुन पुनरागमन करणारी बाॅलिवुड सुंदरी सोनाली बेंद्रेचा नवरा कोण आहे? कसे जुळले होते त्यांचे सुत?”

जाहिरातीत झळकणारी सुंदरी ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करून अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. आज सोनाली अनेक जाहिराती, रिॲलिटी शोमध्ये दिसतेय. पण तिच्या या कठीण काळात तिचा नवरा गोल्डी बहल याने सोनालीला खूप साथ दिली. कॅन्सरवरील उपचारकाळात गोल्डी सतत सोनालीच्या सोबत होता.

सोनालीने सोशल मीडियावर तिच्या कॅन्सर अपडेट शेअर करताना नेहमीच गोल्डीसोबतचे क्षण चाहत्यांशी शेअर केले आहे. गोल्डी आणि सोनाली यांची लव्हस्टोरीही खूप भन्नाट आहे. नुकतीच डान्स इंडिया डान्सच्या मंचावर गोल्डीने त्यांचं कसं जुळलं याचा किस्सा सांगितला. रिॲलिटी शोच्या मंचावर स्पर्धकांच्या टॅलैंटबरोबरच अनेक किस्सेही रंगत असतात. कधी स्पर्धकांच्या आयुष्यातील भावनिक आठवणी सांगितल्या जातात तर कधी विनोदी फवारेही उडतात. असाच एक किस्सा डान्स इंडिया डान्स या रिॲलिटी शोच्या मंचावर घडला.

या शोची जज म्हणून सोनाली बेंद्रे तर दिसतेच पण शादी स्पेशल एपिसोडमध्ये सोनालीसोबत तिचा पती गोल्डी बहलही आला होता. याच एपिसोडमध्ये दोघांनी एकत्र डान्स केला. शादी एपिसोड आहे म्हटल्यावर सोनाली आणि गोल्डीच्या लग्नाच्या आठवणी तर ताज्या होणारच ना. गोल्डीने यावेळी सोनाली आणि त्याची लव्हस्टोरी सांगितली.

एखादया सिनेमात शोभेल अशी त्यांची लव्हस्टोरी ऐकून चाहत्यांना मात्र ट्रीटच मिळाली. गोल्डी म्हणाला, येत्या नोव्हेंबरमध्ये आमच्या लग्नाला २० वर्षे होतील. एका सिनेमाच्या सेटवर मी सोनालीला पाहिलं आणि बघतच राहिलो. पहिल्या नजरेतच मी तिच्या प्रेमात पडलो. तिच्याशी फर्ल्ट करण्याचा प्रयत्न केला पण तिने माझ्याकडे साफ दुर्लक्ष केलं.

‘अंगारे’ या सिनेमाच्या चर्चेसाठी मी जेव्हा तिच्या घरी गेलो तेव्हा माझा खूप छान पाहुणचार झाला.नंतर, याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आमच्यात मैत्री झाली. आधी भांडण मग प्रेम अशी सिनेमात दाखवतात अशी आमची लव्हस्टोरी सुरू झाली. आपल्या खूप छान मैत्रीणीशी आपलं लग्न होणं हा खूप चांगला अनुभव असतो. गोल्डी आणि सोनाली यांना रणवीर नावाचा मुलगा आहे. गोल्डी हा सिनेमा निर्माता आणि दिग्दर्शक आहे. बस इतनासा ख्वाब है या सिनेमाने त्याने करिअरची सुरूवात केली. सोनाली बेंद्रे ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती सिनेमात दिसत नसली तरी जाहिरात आणि रिॲलिटी शोच्या माध्यमातून चाहत्यांना भेटत असते.
स्वप्नील लव्हे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *