महिला शिक्षिकेने सरकारी शाळेचे बदलले रूप, खासगी शाळा पडेल फिकी

सरकारी शाळेचे नाव घेतलं तर डोळ्यासमोर येतो तो जुन्या खोल्यांचा वर्ग, जिथे प्यायला पाणी नाही, वर्गात लाईट नाही, शौचालय नाही, बसायला नीट बाक नाही. अशी सरकारी शाळा डोळ्यापुढे उभी राहते. मात्र तुम्ही कधी ऐकलं आहे का कि खासगी शाळा सोडून लोक सरकारी शाळेत प्रवेश घ्यायला येत आहेत ? नाही ना. पण हे खर आहे. एका महिला शिक्षिकेने शाळेसाठी स्वतः साफसफाई केलीच त्यासोबत स्वतःचे काही पैसे देखील वापरले सोबत सरकारचे पैसे वापरून शाळेचा कायापालट केला.

२०१३ साली पुष्पा यादव या महिला शिक्षिका उत्तर प्रदेश मधील मेरठ जिल्ह्यातील रजपुरा गावातील शाळेवर शाळेच्या हेड म्हणून आल्या. त्या जेव्हा या शाळेवर आल्या तेव्हा शाळेची अवस्था खूपच बिकट होती. शाळेच्या आत गायी, म्हशी बांधलेल्या असायच्या, शाळेच्या भिंती पण नव्हत्या, लांबून पाहिलं तर पडका जुना वाडा वाटायचा. तेव्हा शाळेची अवस्था पाहून पुष्पा यादव यांनी शाळा बदलण्याचा निर्णय घेतला. विभागाच्या अनुरोधाने त्यांनी भिंती बनवून घेतल्या त्यानंतर स्वतः प्रयत्न केले.पुष्पा यादव यांनी स्वतः पैसे खर्च करून शाळेला गेट लावलं, स्वतः साफसफाई केली आणि इतरांकडून देखील करून घेतली. तेथील स्थानीक पुढाऱ्यांकडून, जनतेकडून मदत मागितली. मदतीच्या रूपात कोणी फर्निचर दिले तर कोणी डिजिटल वर्ग बनवण्याचे साहित्य दिले. कोणी पुस्तक दिले तर कोणी रंग लावून दिला. आता या शाळेचे रूप असे झाले आहे कि, ती सरकारी शाळा वाटत नाही तर खासगी शाळा वाटते. भारतभर या शाळेचं आणि शिक्षिका पुष्पा यादव यांचं कौतुक होत आहे.पुष्पा यादव म्हणतात गावात अनेक अपंग मुलं होते जे शाळेत येऊ शकत नव्हते आता त्यांच्यासाठी व्हीलचेअर आहे. तसेच त्यांना फिजियोथेरॅपीच्या माध्यमातून चांगले करण्याचा प्रयत्न केला जातो. पुष्पा यादव यांच्या या मेहनतीचे फळ म्हणून त्यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान देखील केला गेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व शिक्षकांनी शाळा आपली आहे ती स्वछ ठेवा स्वतः शाळेसाठी काहीतरी चांगले करा. मग नक्कीच सगळे विद्यार्थी सरकारी शाळेत प्रवेश घेतील आणि पुढे जाऊन देशाचं नाव मोठे करतील.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *