NMJOKE

आर्मी सैनिकाला लिफ्ट दिल्यानंतर या तरुणीने सांगितला आपला अनुभव

लाज_वाटती_मला_या_समाजाची ! असे शीर्षक देत तरुणीने आपला सैनिकाला लिफ्ट दिल्याचा अनुभव शेअर केला आहे. बरोबर साडेपाचला बायको घरामध्ये आली आणि अस्वस्थ होत समोर बसली. काय झालयं मला काही कळेना. मी लॅपटॉप बाजूला सारला आणि तिच्याकडं पाहत विचारलं, “काही बिनसलं का स्कुलमध्ये ?” त्यावर कोरड्या डोळ्यांनी गॅलरीकडं पाहत म्हणाली, “काही बिनसलं नाही रे, पण एका गोष्टीचं खुप वाईट वाटलं.” हिच्या स्कुलमध्ये नक्की काहीतरी झालं असणार, असा विचार करत मी तिच्याकडं खुर्ची वळवली. तशी ती बोलू लागली, “अरे मी स्कुलमधून निघाले, तोच कॅम्पमध्ये एक सैनिक उभा दिसला. अंगावरच्या कपड्यांवरुन ते लक्षात येत होतं. त्याच्या पाठीवर एक आणि हातात दोन बॅगा होत्या. येणाऱ्या गाड्यांना तो हात करत होता. पण, त्याच्या हातातलं सामान पाहून कुणीच थांबत नव्हतं. नेमका तो अशा ठिकाणी उभा होता, की तिथं बस येण्याचा प्रश्‍न नव्हता. म्हणून मी त्याच्यासमोर जाऊन थांबले. तर शेजारच्या गाड्यांवरुन जाणारे पुरुष आणि बायाही माझ्याकडं तिरक्‍या नजरेनं पाहू लागल्या. मी थांबलेली पाहून त्या सैनिकानं विचारलं, “दिदी कुठपर्यंत जाणार आहात तुम्ही ?”

मी म्हणाले, “तुम्हाला त्या कॅनॉलपर्यंत सोडू शकते. तिथून तुम्हाला बस मिळेल.” स्मित करत तो गाडीवर बसण्यास तयार झाला. त्यानं दोन्ही बॅगा स्वत:च्या मांडीवर अशा पद्धतीने घेतल्या की मला त्याचा धक्काही लागणार नाही. तो गाडीवर बसला. पण, रेस वाढवूनही गाडी पुढं सरकत नव्हती. तर त्यानं एका पायानं जोर देत गाडी पुढं ढकलली. “कुठून आलात” असं मी त्याला विचारलं, तर म्हणाला, “श्रीनगरवरुन आलोय. स्टेशनवरुन आमची गाडी होती. त्या ट्रकमध्ये कॅन्टोन्मेंटपर्यंत आलो. पण, इथून पुढं जायला बस, रिक्षा काहीच मिळत नव्हतं. म्हणून गाड्यांना हात करत होतो.” माझी गाडी आता बऱ्यापैकी धावत होती. स्पीडब्रेकर आल्यावर मी ब्रेक दाबत होते. पण, तो थोडाही पुढं येत नव्हता. उलट त्यानं गाडीचं कॅरियर पकडून धरलं होतं. कॅनॉल येताच मी गाडी थांबवली. तसं मी त्याला स्वत:हून विचारलं की तुम्हाला नेमकं कुठं जायचंयं ? तसा तो म्हणाला, “मी सासवडचा आहे. अडीच वर्षानंतर आलोय. मला हडपसरला जायचंय. तिथुन एसटी मिळेल मला.” त्यावर मी त्याला म्हणाले की चला मी तुम्हाला हडपसरला सोडते. त्याला मोठा आनंद झाला आणि तो पुन्हा त्याच आत्मियतेने गाडीवर बसला. तो बसत असताना मात्र आजुबाजूचे लोक मोठ्या कुतूहलाने माझ्याकडं पाहत होते. काहींना माझा अभिमान वाटत असावा. काहीजण मात्र, गालातल्या गालात कुत्सित हसत होते. एका तरण्याबांड जवानाला मी गाडीवर बसवतीये, अशी काहीतरी घाणेरडी भावना साऱ्या लोकांच्या डोळ्यात होती. तो बिचारा अडीच वर्षांनी त्याच्या घरी आलाय. त्याला लिफ्ट द्यायला एक माणूस थांबत नव्हता. तो तिकडं आपल्या देशाच्या सीमेवर बिनधास्त उभा राहतो, म्हणून आपण हितं निवांत झोपतो आणि मी त्याला लिफ्ट दिली तर हे हरामखोर लोक माझ्याकडं पाहून हसत होते.” काय चुक केली होती रे मी ? असं म्हणत बायको रडायलाच लागली. तिला सावरणेही शक्‍य नव्हते. तशी रडक्‍या डोळ्यांनी पुढं बोलू लागली,
“मी त्याला हडपसरला सोडलं, तेव्हा तो काय म्हणाला माहितीये, दिदी आम्हाला चालायची सवय असते. पण, जेव्हा आम्ही चालून थकतो, तेव्हा इथल्या बायातर सोडा, पुरुषही आम्हाला लिफ्ट देत नाहीत. असो.” असं म्हणत त्यानं नमस्कार केला आणि बसस्टॉपच्या दिशेने निघून गेला…. खरोखरच लाज वाटतीये मला या समाजाची ! असं म्हणत पुन्हा पंधरा मिनिट बायको फक्त मुसमुसत राहिली. अशा प्रसंगाच्या अनुभवानंतर समजूत तरी घालणार कशी ?

साभार – https://www.facebook.com/photo.php?fbid=10219367781053083&set=a.2676184031662&type=3&theater

Exit mobile version